Wednesday, December 7, 2011

घरी चाललो मी

काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी
काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी

काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी
काम नाही,.... मी

बॉसने कामं, दिलं मला, कामं खूपच वाईटं
बदलून द्यायला, नाही म्हणतो, दुष्टपणाची हाईटं

काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी
काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी

जायची वेळं, आली आता, केली बॅग पॅक
बस इथच, म्हणला मला, कर bug crack

काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी
काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी

पुष्कळ कामं, संपेना काहीच, target आलं near
weekend आला, बॉस म्हणतो, fix कर share


काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी
काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी

weekend ला, रात्रभर कामं, चेष्टा आहे का राव्वं
वाटता मला, सन्यास घेऊन, हिमालयी जाव्वं
राजीनाम्यावर टाकलं नाव्वं, संपली सगळी हाव्वं
सायकलचा तो निर्णय wise, नक्को rolls royce

काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी
काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी
काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी
काम नाही, घरी चाललो, घरी चाललो, घरी चाललो, मी

                                                            काव्यानंद

Wednesday, August 31, 2011

गजनी का-अंत (अंतिम भाग)

    ॲनालिसिस नंतर बाबाने महत्वाचा निष्कर्ष काढला की, जेव्हा जेव्हा कर्नल थकतो, तेव्हा तो आपलं डोकं खाजवतो. त्या वेळी त्याचे केस ताणले जाऊन त्याच्या डोक्यातील काही झोपलेल्या पेशी (sleeper cells) कार्यान्वित होतात. ही प्रक्रिया झाल्यावर कर्नलला प्रचंड उर्जा मिळते आणि तो पुन्हा लढायला तयार होतो. त्यामुळे कर्नलला अडवण्याचा उपाय एकच होता, की तो थकल्यावर त्याला डोकं खाजवण्यापासून रोखणे.
    एवढा साधा उपाय सुचवण्यासाठी बाबाने आपल्याकडून मोठी रक्कम उकळली हे कळल्यावर कुणालला जरा दुःखं झाले. पण ही वेळ दुः खात बसण्याची नव्हती. त्याने एक प्लान ठरवला. पण तो अमलात आणण्यासाठी त्याला काही साथीदारांची गरज होती. सर्वप्रथम त्याला हवा होता तो एक बळीचा बकरा. ह्या मनुष्याचे काम कर्नलला आव्हान देऊन मारामारीसाठी प्रवृत्त करणे, आणि नंतर त्याचा मार चुकवणे हे होते. ह्या मागील उद्देश हाच होता की ह्या बकऱ्यामागे धावून कर्नल थकून जाईल, आणि मग त्यावर खरा हल्ला चढवता येईल. कुणालला लागलीच त्याच्या कॉलेज मधील मित्राची आठवण झाली. सॅम-दा-कांबळे हा कॉलेजमधील कांबळे द्वयांमधला एक. दोघेही कांबळे पळून जाण्यासाठी प्रसिद्ध होते. कॉलेजच्या गेट वरच त्यांना कोणत्याही वर्गातील common-off ची हवा जरी लागली तरी ते पसार व्हायचे. कुणालला विश्वास होता की सॅम हे काम नक्कीच पार पडू शकेल. सॅमनेही काम ऐकल्यावर लगेच होकार दिला.
    आता गरज होती ती कर्नलला मारणारा योद्धा शोधण्याची. खरेतर क्युब्स आणि कुणाल दोघेही कर्नलला मारहाण करणारच होते, पण कुणालला भीती वाटत होती की जर दोघांची ताकद कमी पडली आणि कर्नल चुकून जरी सावध झाला, तर संपूर्ण प्लान वाया जाणार होता. शिवाय ही कर्नलला मारण्याची एकमेव संधी होती, कारण पुढच्या वेळेपासून तो सावध बनला असता. कुणालने प्रथम कर्नलचे गुरु सागू पहिलवान यांना या कामासाठी विचारले. परंतु सागुने यास नकार दिला. आपल्याच शिष्याविरुद्ध हात उगारणार नाही असे त्याचे तत्व होते. कुणालने सांगितले की कर्नल त्याच्या बळाचा गैर-वापर करतो आहे आणि तेही संपत्ती कमावण्यासाठी, पण सागूच्या लेखी ह्या जगातील नीती मूल्यांचे काहीच मोल नव्हते.
    हताश होऊन बसलेला असतानाच कुणालला क्युब्सने एक आनंदाची बातमी दिली. त्यांच्या कॉलेज मध्ये मिल्झ नावाचा एक दुर्बळ मुलगा होता. त्याची कॉलेज मध्ये इतकी थट्टा केली जायची की तो चिडला. कॉलेज संपल्यावर त्याने कुंग-फु बाबाच्या हाताखाली राहून कुंग-फु विद्या शिकून घेतली. आता जरी तो दिसायला काटक असला, तरी लँबसारखे सोंडे सहजतेने लोळवू शकत होता. शिवाय क्युब्सने मिल्झला विचारल्यावर त्याने लागलीच होकारही दिला. कुणाल खुश झाला.
    सगळी तयारी झाली होती. अर्थात कर्नलचा सतत वावर असल्याने त्यांना अत्यंत गुप्तता राखावी लागली होती. प्लान सरळ-साधा पण परिणामकारक होता. शिवाय ही एकमेव संधी असल्याचे सगळे जाणून होते. ठरलेल्या दिवशी सॅम-दा-कांबळे हॉटेल मध्ये आला. त्याने दारू मागवली व पिण्याचे ढोंग करत बसला. खरं तर त्याला दारू प्यायची होती, पण तो प्लानमध्ये महत्वाची भूमिका निभावत असल्यामुळे सगळ्यांनी त्याला दारू न ढोसण्याबद्धल सक्त बजावले होते. कुणालने त्याला "यश मिळाल्यावर एक दिवस हवी तेवढी दारू देईन" असे आश्वासन दिले होते. सॅमने दारू शेजाऱ्याला मोठ्या मनाने दान केली व तो उठला. प्लान प्रमाणे बिल न देताच तो बाहेर जाऊ लागला. कर्नलच्या तीक्ष्ण डोळ्यांमधून हे सुटले नाही. त्याने सॅमला बिल देण्याविषयी दरडावले. सॅम बधला नाही. तो बाहेर जायच्या दिशेने चालू लागला. कर्नलने लागलीच आपला हात उगारला. सॅमला असे काही होणार ह्याची कल्पना असली तरी तो पूर्णतः सावध नव्हता. कर्नलचा ठोसा त्याला निसटता लागला. सॅम धडपडला, पण प्रसंगावधान राखून पळत सुटला. कर्नलही त्याच्या मागे पळू लागला. सॅमने अनेक हिंदी आणि इंग्लिश पिक्चर पाहिलेले असल्यामुळे त्याला कर्नलच्या पळण्यात बाधा कशी निर्माण करायची हे ठाऊक होते. सगळे अडथळे पार करून सॅमच्या मागे धावताना कर्नल मेटाकुटीला आला. सॅमने हॉटेलला 5 चकरा मारल्या होत्या, अजूनही कर्नल थकत नाही हे पाहून सगळ्यांचाच आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला होता. पण शेवटी एका टेबल वरून उडी मारताना कर्नल पडला. नंतर तो काही वेळ तसाच उभा राहिला. पुढे काय होणार याची कुणालला कल्पना आली, त्याने क्युब्स आणि मिल्झला इशारा केला. कर्नलने त्याचा हात डोक्याच्या दिशेने न्यायला सुरुवात केली तोच क्युब्स आणि कुणाल त्याच्या अंगावर तुटून पडले. कर्नल धडपडला आणि खाली कोसळला. त्याने पहिले की कुणाल आणि क्युब्सने जाणून बुजून आपल्याला धक्का दिला. त्यांची चाल कर्नलच्या लक्षात आली. तो चिडून उभा राहिला. कर्नल थकलेला होता व त्याला अजून स्पेशल पॉवर मिळाली नव्हती, त्यामुळे कुणालला वाटले की आपण काही वेळ तरी त्याला रोखू शकतो. त्याने व क्युब्सने कर्नलचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण कर्नलने सहजपणे दोघांना झटका देऊन खाली पाडले. आता सगळी मदार मिल्झवर होती.
    मात्र मिल्झ सावध होता. त्याने पहिले की कर्नल आपल्या डोक्याकडे हात नेतो आहे, त्याने आपले कौशल्य वापरून कर्नलचे दोन्ही हात ब्लॉक करून टाकले. कर्नल त्या कुंग-फु ब्लॉक मधून हात काढतो न काढतो तोच, मिल्झचा ठोसा त्याच्या दगडी छातीवर बसला. त्या प्रहरातील अचाट शक्तीने तो दगडही थोडासा डगमगला. मिल्झने क्षणाचीही उसंत न घेता कुंग-फु मधील कौशल्य पणाला लावून ठोसे आणि लाथांचा कर्नलवर भडीमार केला. कर्नलने मैदानी कुस्ती सोडून बरेच दिवस झालेले असल्याने त्याला कुस्तीमधील एकही डाव-पेच आठवला नाही. तो गांगरला आणि बचावाचा केविलवाणा प्रयत्न करू लागला. कर्नलचा निभाव लागला नाही आणि शेवटी तो कोसळला.
    तो कोसळलेला पाहून कुणालने आनंदाने आरोळी ठोकली. क्युब्स, मिल्झ आणि सॅम सुद्धा आनंदाने नाचू लागले. कुणालने कर्नलला सागुच्या आखाड्यात पोचवण्याची व्यवस्था केली आणि सगळ्या उपस्थितांना मोफत जेवण आणि दारूची घोषणा केली. काही वेळातच सलीम आणि हँडसम आपापल्या मित्रांना घेऊन जल्लोष स्थळी पोहोचले. दारूच्या नद्या वाहायला प्रारंभ झाला. कुणाल आणि क्युब्सला हर्षवायू झाला होता. अर्थात ह्याला कारणही तसेच होते. एका नराधम गजनीचा अंत झाला होता.
                                                                                        काव्यानंद






Tuesday, February 15, 2011

गजनी का-अंत (भाग ३)

कर्नलला हळूहळू आपल्या ताकदीचा गर्व चढू लागला. हॉटेलच्या प्रगतीला केवळ आपण जबाबदार आहोत अशी त्याची धारणा बनली. तो आता कोणालाही न विचारता कुणालच्या गल्ल्यावर हात टाकू लागला. आपणच हॉटेलचे मालक आहोत अशा थाटात वावरू लागला.
सुरुवातीला कुणालने गजनिकांतच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले, पण हळूहळू हा प्रकार हाताबाहेर गेला. त्याने एकदोनदा कर्नलला समजावून पहिले, पण परिणाम शून्य. शेवटी कर्नलचा बंदोबस्त करावा लागेल हे त्याच्या लक्षात आले. कुणाल तयारीला लागला.
सर्वप्रथम त्याने आपल्या मित्रांना मदतीसाठी विचारणा केली पण कर्नलचे नाव ऐकताच बहुतेकांनी पाठ फिरवली. निराश मनस्थितीत विचार करत असतानाच कुणालला कर्नलच्या कॉलेजमधल्या शत्रूची आठवण झाली. तो त्वरित त्या शत्रूकडे गेला. कुल क्युब्सनेही कुणालला आनंदाने होकार दिला.
कॉलेजमध्ये असताना कर्नलच्या हट्टामुळे कुल क्युब्स आणि मित्रांचे कॉमन ऑफ यशस्वी होत नव्हते. त्यामुळे इतर सर्वांची उपस्थिती कमी भरायची. परिणामी दरवेळी त्यांना ओरडाही खावा लागे व दंडही भरावा लागेल. एरवी क्युब्सला दंडाचे काही वाटत नसे. पण त्यांच्या वर्गातील एका मुलाचा प्रभाव पडून त्याला पै-पै चे मोल कळू लागले होते. त्यामुळे आपल्या मौल्यवान संपत्तीच्या चुथड्यास जबाबदार कर्नलला धडा शिकवण्यास तो लगेच तयार झाला.
पण कुणालला साथीदार मिळाला तरी त्याच्या पुढील संकट कायम होते. कर्नलला कसे नामोहरम करावे ह्या विवंचनेत तो सापडला होता. शेवटी क्युब्स्ने त्याला एका तज्ञाची मदत घेण्यास सांगितले. त्याच्या डोळ्यासमोर त्या क्षणी एकच नाव होते 'kung-fu बाबा'.
अर्थात बाबा सल्ले देत असला तरी त्याची कन्सलटंसी फी जबरदस्त होती. पण कुणाल कर्नलचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी किंमत चुकवण्यास तयार होता.
ते बाबाकडे गेले. बाबाने रिक्षाच्या मीटरसारखे  एक device चालू केले. ते मीटर झालेल्या वेळेप्रमाणे फी दाखवत असे. बाबाने समस्या काय आहे अशी पृच्छा केली. कुणाल सांगू लागला. सांगता सांगता त्याला धाप लागली. बाबाने ३ ग्लास पाणी मागवले. त्या तीनही ग्लासचे पैसे कन्सलटंसी फी मध्ये लावल्याचे कुणालला नंतर कळले.
"सर्वप्रथम आपल्याला कर्नलचा कच्चा दुवा काढावा लागेल" बाबा म्हणाला. "त्यासाठी आपल्यालाला कर्नलचे मारहाण चालू असताना video काढावे लागतील. त्यांच्यावर video processing लावून analysis करावा लागेल. शेवटी त्यावर kung-fu मधील उपाय सुचवावा लागेल". कुणाल तयार झाला. बाबाने कॅमेराचे पैसे, video processing tool लिहायचे पैसे व kung-fu मधील उपाय सुचवण्याची फी तसेच video काढताना हॉटेलमध्ये फुकट जेवण अशी एकूण फी सांगितली. तो आकडा ऐकून कुणालचे डोळे पांढरे झाले पण एक मोठा त्रास संपवण्यासाठी त्याला तडजोड करणे आवश्यक होते.
                                                                                                              (क्रमशः)
                                                                                   काव्यानंद

Sunday, January 16, 2011

गजनी का-अंत (भाग २)

हे दृश्य हळू-हळू नेहमीचेच झाले. रोज कोणी ना कोणी पैसे बुडवून पळताना पकडला जाई व गजनीकांतहस्ते तुडवला जाई. केवळ हे मनोहारी दृश्य बघण्यासाठी कुणालच्या हॉटेलात तुडुंब गर्दी होऊ लागली.
रोजचा कस्टमर सलीम फेकूला हे दृश्य पाहून एक कल्पना सुचली. त्याने आपला जानी दुश्मन हँडसमचा काटा कर्नलकरवी काढायचे ठरवले. खरतर हँडसम सलीमचा जुना दोस्त. दोघंही दररोज एकत्र दारू पिऊन आपल्या व्यथा मांडणारे. दररोजच्या त्यांच्या संभाषणाचा शेवट ठराविक प्रकारेच व्हायचा. "ये दुनिया बडी बेरहम और पत्थरदिल है दोस्त" हँडसम म्हणायचा. "अरे इसी पत्थरदिल दुनिया के जिगर का छल्ला है तू हँडसम !" सलीम म्हणायचा. त्यानंतर ते घरी जायचे. बिल देण्याचा तर प्रश्नच नव्हता. एके दिवशी हँडसम म्हणायचा "मै कही भाग जा रहा क्या भाई? मिलता ना तुम्हारा पैसा" तर दुसरे दिवशी सलीम "हौ रे मिलते तेरे पैसे. सडी सुरतो का सिग्रेट अड्डा है ये" असे म्हणून कुणालच्याच हॉटेलला शिव्या मारून जायचा. ही अभद्र युती तोडण्यासाठी कुणालनेच 'फोडा आणि झोडा' नीती वापरून दोघांना वेगळे केले होते.
योजनेनुसार दुसऱ्या दिवशी सलीम हँडसमकडे गेला. आपल्याला पश्चात्ताप झाला आहे असे सांगून "पुरानी दुष्मनी भूल जाओ यारो" अशी साद घातली व फुकट दारू पाजायचे कबूल केले.
दोघेही कुणालच्या हॉटेलात गेले. गेल्यावर सलीम बारवरच्या वेटरच्या कानात काहीतरी पुटपुटला. वेटरने मान डोलावली. सलीमने हँडसमला बारवर जाऊन 'स्टार्ट' होण्यास सांगितले व आपण ५ मिनिटात येतो म्हणून तो सटकला. हँडसम बऱ्याच दिवसांनी मनसोक्त दारू पीत होता.
पिणे संपले तरी सलीम दिसेना म्हणून त्याने वेटरला विचारले. "ते केव्हाच गेले. आम्ही दोघे बरोबर नाहीत असे त्यांनी सांगितले." सलीमला मनातल्या मनात दोन शिव्या हासडून हँडसम निघाला. कुणालवर त्याने नेहमीचाच डायलॉग फेकला, पण कर्नल दारात उभा होता. हँडसमने कर्नलशीही लाडीगोडी करण्याचा प्रयत्न केला, पण गजनीकांत दगडासारखा उभा होता. हँडसमचा लाडीगोडीचा प्रयत्न पाहून त्याला राग आला. त्याने पहिला फटका हँडसमच्या कानशिलावर दिला. हँडसम धडपडला. कर्नलने पूर्ण उत्साहात फटकेबाजी सुरु केली. सलीम रोडपलीकडे एका कोपऱ्यात लपून ह्या show चा पूर्ण आनंद लुटत होता.
दुसऱ्या दिवशी ही गोष्ट हँडसमचा जिवलग मित्र रज्जू-मुज्जुला कळाली. त्याला भयंकर संताप आला. त्याने आधी हँडसमची फुकट दारूच्या अमिषाला भाळल्याबद्धल खरडपट्टी  काढली. नंतर त्याने सलीमला त्याच्याच औषधाची चव देण्याचे ठरवले.
एके दिवशी सलीमला त्याने रस्त्यात पकडून सांगितले कि त्याला शाळेत शिपायाची नोकरी लागली आहे. सलीमने पार्टी मागताच त्याने तत्काळ कबूल केली व त्याला कुणालच्या हॉटेलवर घेऊन गेला. रज्जू व हँडसम यांच्या मैत्रीची खबर सलीमला नसल्यामुळे त्याला काही संशय आला नाही. रज्जूने गेम रिपीट केला. सलीमला दारू ढोसायला लावून तो सटकला. सलीमच्या हे लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता.
पण सलीमने धीर सोडला नाही. काउंटरवर 'एक तिखट मिसळ व पाच मठ्ठा' यांचे बिल देणाऱ्या म्युल्चे पाकीट त्याने मारले. त्यात दोन रुपये व एक रुपयाच्या नोटेचे तुकडे जुळवून केलेली नोट व 'पाकीटमार तेरा मुह काला' अशी चिठ्ठी पाहून सलीम चरफडला. शेवटी हातचलाखीची परिसीमा दाखवून त्याने गल्ल्यातीलाच थोडे पैसे चोरले व कसेबसे बिल भरले.
इकडे फुकटे गिऱ्हाईक कमी झाल्याने कुणालचा धंदा वधारला होता. त्याने याबद्धल पुनःपुन्हा कर्नलचे  आभार मानले. कर्नलचे गुरु पै. सागुदेखील त्याचे कारनामे पाहण्यास हॉटेलमध्ये आले व त्याची कौशल्ये पाहून त्याची पाठ थोपटून गेले. ह्या सगळ्याचा परिणाम होऊन कर्नलच्या मनात वेगळीच विचारचक्रे सुरु झाली. 
                                                                              (क्रमशः)
        
                                                                 काव्यानंद

Monday, January 10, 2011

गजनी का-अंत (भाग १)

लँब दारूची दुसरी बाटली संपवून उठला. आज त्याने नेहमीपेक्षा तासभर जास्त व्यायाम केला होता. आपल्या शरीरावरचे बळकट स्नायू पाहून तो उन्मत्त झाला. त्याने खाण्या-पिण्याचे पैसे न देण्याचा निश्चय केला.
    हॉटेलमधून बाहेर जाता जाता त्याने कुत्सित नजरेने कुणालकडे बघितले. कुणाल नेहमीप्रमाणे गल्ल्यावर बसून मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न होता. दिवसभरातील १२ तास गल्ल्यावर लोळणे व उरलेला वेळ घरी लोळणे हीच त्याची दैनंदिनी बनून गेली होती. एका वेटरने मात्र लँबला बिलाबद्धल  हटकले. लँबने इंग्रजीत काहीतरी बरळत त्याला दूर ढकलले. तो वेटर धडपडला व त्या आवाजाने कुणालचे लक्ष विचलीत झाले. कुणालने कोणालातरी खुण केली.
त्याचक्षणी विद्युतगतीने कर्नल गजनीकांत लँबसमोर आला. "First of all, Good evening" कर्नल म्हणाला, "आपण बिलाचे पैसे दिलेले नाहीत. कृपया ते द्या". लँबने गजनीकांतकडे पहिले. बाह्यस्वरूपावरूनतरी त्याच्यात काही दम आहे असे लँबला वाटले नाही. "अबे हाट" तो ओरडला व सवयीने त्याने इंग्रजीत ४-५ शिव्या झाडल्या. कर्नल दगडासारखा निश्चल उभा होता. शेवटी लँबला संताप आवरला नाही. त्याने आपल्या मुष्टीने गजनीकांतच्या छातीवर प्रहार केला आणि क्षणभरातच दगड हातांवर मारावा तसा रडू लागला. क्षणार्धातच कर्नलची लाथ त्याच्या पोटावर बसली.  त्याचे पोट गलबलले. कर्नलने पुन्हा लाथ झाडली पण त्यावेळी लँबने त्याचा पाय पकडून त्याला फरशीवर आदळले. लँबने कर्नलचा शर्ट पकडून ओढला तर कर्नल तसूभरही हलला नाही. त्याचा शर्ट मात्र फाटला. कर्नलने आपली छाती गोंदवून घेतली होती. एका बाजूला 'सुजाता' व दुसऱ्या बाजूला 'काटाकिर्र' अशी ती अक्षरे होती.
गजनीकांत उठला. त्याची व लँबची झुंज सुरु झाली. लँब कर्नलचा गळा पकडण्याचा प्रयत्न करत होता पण कर्नल त्याचा हा डाव वारंवार चुकवत होता. शेवटी चिडून लँबने कर्नलच्या डोक्यावर प्रहार केला.
कर्नल blank झाला. त्याला काहीच आठवेना. समोर कोणीतरी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतो आहे एवढेच त्याला दिसले. त्याने 'च्यामायला' म्हणत डोके खाजवले. आणि तत्क्षणी कर्नलची स्मरणशक्ती परत आली. तसेच त्याच्या अंगी शेकडो दगडांचे बळही संचारले.
संपूर्ण ताकदीनीशी त्याने लँबवर २-३ प्रहार केले आणि लँब मूर्च्छित होत कोसळला.
                                                                                                      (क्रमशः)
    काव्यानंद