Sunday, July 5, 2020

कर्नल locked-down (भाग पहिला)

दिवस १: कर्नलने उठून पाहिले तर घड्याळात सकाळचे ९ वाजले होते. '१ दिवस उशिरा उठल्याने काही फरक पडत नाही' असं स्वतःशी बोलत तो उठला.  चहा नाश्ता झाल्यावर जड होऊन तो सोफ्यावर पसरला आणि टीव्ही  बघू  लागला. लॉकडाउनचा पहिला दिवस असल्यामुळे सगळीकडे त्याच बातम्या होत्या. टीव्ही आणि मोबाईल वर टाईमपास करेपर्यंत जेवायची वेळ झाली होती.  जेवायला सीझनचा पहिला आमरस होता.  आमरस मनसोक्त हादडल्यावर कर्नल पुन्हा आपल्या खोलीत गेला.  थोडी विश्रांती घ्यावी म्हणून तो पलंगावर आडवा झाला.  आज बाबा असता तर त्याला रस खाण्याची माझी कपॅसिटी दाखवली असती असा विचार करत तो पुन्हा झोपी गेला.  वामकुक्षी संपली तेव्हा घड्याळात ५.३० वाजले होते.  त्याने थोडा कामाचा विचार केला पण सुट्टीचा पहिला दिवस आल्याने तो विचार झटकून टाकला.  टीव्हीवर साऊथ इंडियन डब चित्रपट चालू झाला होता, तो बघण्यात कर्नल गुंगून गेला. चित्रपट संपवून तो सरळ जेवणाच्या ताटावर जाऊन बसला. उद्यापासून नक्की काम करू असा विचार करेपर्यंत त्याला पुन्हा झोपपण आली. 

दिवस २: डोळे उघडले तेव्हा सकाळचे ७ वाजले होते.  व्यायाम करावा असा म्हणत तो गच्चीवर गेला. १५-२० मिनिट गावाची टेहळणी केल्यावर त्याला व्यायामाची आठवण झाली. पण वॉर्म-अप होईपर्यंत उन्हाचे चटके बसू लागल्याने तो खाली गेला. चहा नाश्त्यानंतर त्याने केकेला फोन केला.  केकेने जड डोळे उघडून  फोनकडे पाहिले. कर्नलचे नाव बघितल्यावर 'ब्लॉक फॉर द डे' चा ऑप्शन चालू  करून तो पुन्हा झोपी गेला. ४-५ वेळा फोन करूनही न उचलल्याने कर्नलने लॅपटॉप चालू केला. पेंडिंग तिकिटांच्या यादीमधले सर्वात सोपे तिकीट उघडले. त्या संदर्भातला कोड उघडल्यावर त्याला सगळेच अनोळखी वाटू लागले.  कोडच्या २-३ ओळी  समजून घेण्याचा व्यर्थ प्रयत्न सोडून त्याने सरळ इतर तिकिटांकडे लक्ष दिले. प्रत्येक ठिकाणी सर्व्हर आणि डेटाबेस रिस्टार्ट करून त्यातले जे-जे प्रश्न सुटले, ती तिकिटे समाप्त करून त्याने दिवसाच्या कामाची सांगता केली.

संध्याकाळी जेव्हा केकेच्या लक्षात आले कि त्याने शेड्युल केलेले अपडेट कर्नलच्या प्रतापामुळे पूर्ण झाले नाहीत तेव्हा चिडून त्याने कर्नलला फोन लावला. कर्नल म्हणाला की त्याने यासाठीच ५-६ वेळा फोन केलेला जो केकेने उचललाच नाही. केकेने 'मिटिंग चालू होती' असे कारण दिले व चरफडत फोन ठेवला. 

दिवस ३: आज कर्नल लवकर उठून फिरून आला. चहा घेतल्यावर त्याला फ्रेश वाटू लागले व आज काहीतरी नवीन प्रोजेक्ट करावा अशी इच्छा होऊ लागली. बाबाला इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रोजेक्ट विषयी विचारावे म्हणून त्याने सकाळी ८ वाजताच फोन लावला. बाबा व्यायाम करत असताना फोनची रिंग ऐकू आली व त्याने साफ दुर्लक्ष केले.

अलार्म सिस्टीमबद्धल जुजबी माहिती काढता काढता ११ वाजले.  बाबाचा परत फोन आला नाही म्हणून कर्नलने पुन्हा फोन लावला. बाबाने गेम पॉझ केला आणि फोन उचलला. कर्नल बोलू लागताच बाबाच्या लक्षात आले की हा खूप वेळ घेणार. त्याने कर्नलचे भाषण मधेच तोडले व म्हणाला की  तो कामात आहे व वेळ मिळाल्यावर आरामात बोलेल. 

कर्नलची नेहमीची कामे आणि जेवण उरकले. २.३० वाजले तरी बाबाचा काही फोन नव्हता. कर्नलने पुन्हा केला तर बाबा गाढ वामकुक्षीत होता. कर्नल मनाशी चरफडला.  सायंकाळी ६ वाजता पुन्हा कर्नलने फोन केला त्यावेळी बाबा युट्युबवर कार्टून बघत होता. फोनवर तो म्हणाला की अजून काम संपलेलच नाही, पण थोडा वेळ बोलू शकतो.  कर्नल बोलू लागला.  थोडा वेळ बाबाने इंटरेस्ट घेऊन ऐकले पण नंतर तो कंटाळला आणि फक्त हु हु करून उत्तरे देऊ लागला.  तासभर बोलल्यावर कर्नलच्या लक्षात आले की बाबा काहीच ऐकत नाही. हताश होऊन त्याने फोन ठेवला.
(क्रमशः)
                                                                                           काव्यानंद