Wednesday, August 31, 2011

गजनी का-अंत (अंतिम भाग)

    ॲनालिसिस नंतर बाबाने महत्वाचा निष्कर्ष काढला की, जेव्हा जेव्हा कर्नल थकतो, तेव्हा तो आपलं डोकं खाजवतो. त्या वेळी त्याचे केस ताणले जाऊन त्याच्या डोक्यातील काही झोपलेल्या पेशी (sleeper cells) कार्यान्वित होतात. ही प्रक्रिया झाल्यावर कर्नलला प्रचंड उर्जा मिळते आणि तो पुन्हा लढायला तयार होतो. त्यामुळे कर्नलला अडवण्याचा उपाय एकच होता, की तो थकल्यावर त्याला डोकं खाजवण्यापासून रोखणे.
    एवढा साधा उपाय सुचवण्यासाठी बाबाने आपल्याकडून मोठी रक्कम उकळली हे कळल्यावर कुणालला जरा दुःखं झाले. पण ही वेळ दुः खात बसण्याची नव्हती. त्याने एक प्लान ठरवला. पण तो अमलात आणण्यासाठी त्याला काही साथीदारांची गरज होती. सर्वप्रथम त्याला हवा होता तो एक बळीचा बकरा. ह्या मनुष्याचे काम कर्नलला आव्हान देऊन मारामारीसाठी प्रवृत्त करणे, आणि नंतर त्याचा मार चुकवणे हे होते. ह्या मागील उद्देश हाच होता की ह्या बकऱ्यामागे धावून कर्नल थकून जाईल, आणि मग त्यावर खरा हल्ला चढवता येईल. कुणालला लागलीच त्याच्या कॉलेज मधील मित्राची आठवण झाली. सॅम-दा-कांबळे हा कॉलेजमधील कांबळे द्वयांमधला एक. दोघेही कांबळे पळून जाण्यासाठी प्रसिद्ध होते. कॉलेजच्या गेट वरच त्यांना कोणत्याही वर्गातील common-off ची हवा जरी लागली तरी ते पसार व्हायचे. कुणालला विश्वास होता की सॅम हे काम नक्कीच पार पडू शकेल. सॅमनेही काम ऐकल्यावर लगेच होकार दिला.
    आता गरज होती ती कर्नलला मारणारा योद्धा शोधण्याची. खरेतर क्युब्स आणि कुणाल दोघेही कर्नलला मारहाण करणारच होते, पण कुणालला भीती वाटत होती की जर दोघांची ताकद कमी पडली आणि कर्नल चुकून जरी सावध झाला, तर संपूर्ण प्लान वाया जाणार होता. शिवाय ही कर्नलला मारण्याची एकमेव संधी होती, कारण पुढच्या वेळेपासून तो सावध बनला असता. कुणालने प्रथम कर्नलचे गुरु सागू पहिलवान यांना या कामासाठी विचारले. परंतु सागुने यास नकार दिला. आपल्याच शिष्याविरुद्ध हात उगारणार नाही असे त्याचे तत्व होते. कुणालने सांगितले की कर्नल त्याच्या बळाचा गैर-वापर करतो आहे आणि तेही संपत्ती कमावण्यासाठी, पण सागूच्या लेखी ह्या जगातील नीती मूल्यांचे काहीच मोल नव्हते.
    हताश होऊन बसलेला असतानाच कुणालला क्युब्सने एक आनंदाची बातमी दिली. त्यांच्या कॉलेज मध्ये मिल्झ नावाचा एक दुर्बळ मुलगा होता. त्याची कॉलेज मध्ये इतकी थट्टा केली जायची की तो चिडला. कॉलेज संपल्यावर त्याने कुंग-फु बाबाच्या हाताखाली राहून कुंग-फु विद्या शिकून घेतली. आता जरी तो दिसायला काटक असला, तरी लँबसारखे सोंडे सहजतेने लोळवू शकत होता. शिवाय क्युब्सने मिल्झला विचारल्यावर त्याने लागलीच होकारही दिला. कुणाल खुश झाला.
    सगळी तयारी झाली होती. अर्थात कर्नलचा सतत वावर असल्याने त्यांना अत्यंत गुप्तता राखावी लागली होती. प्लान सरळ-साधा पण परिणामकारक होता. शिवाय ही एकमेव संधी असल्याचे सगळे जाणून होते. ठरलेल्या दिवशी सॅम-दा-कांबळे हॉटेल मध्ये आला. त्याने दारू मागवली व पिण्याचे ढोंग करत बसला. खरं तर त्याला दारू प्यायची होती, पण तो प्लानमध्ये महत्वाची भूमिका निभावत असल्यामुळे सगळ्यांनी त्याला दारू न ढोसण्याबद्धल सक्त बजावले होते. कुणालने त्याला "यश मिळाल्यावर एक दिवस हवी तेवढी दारू देईन" असे आश्वासन दिले होते. सॅमने दारू शेजाऱ्याला मोठ्या मनाने दान केली व तो उठला. प्लान प्रमाणे बिल न देताच तो बाहेर जाऊ लागला. कर्नलच्या तीक्ष्ण डोळ्यांमधून हे सुटले नाही. त्याने सॅमला बिल देण्याविषयी दरडावले. सॅम बधला नाही. तो बाहेर जायच्या दिशेने चालू लागला. कर्नलने लागलीच आपला हात उगारला. सॅमला असे काही होणार ह्याची कल्पना असली तरी तो पूर्णतः सावध नव्हता. कर्नलचा ठोसा त्याला निसटता लागला. सॅम धडपडला, पण प्रसंगावधान राखून पळत सुटला. कर्नलही त्याच्या मागे पळू लागला. सॅमने अनेक हिंदी आणि इंग्लिश पिक्चर पाहिलेले असल्यामुळे त्याला कर्नलच्या पळण्यात बाधा कशी निर्माण करायची हे ठाऊक होते. सगळे अडथळे पार करून सॅमच्या मागे धावताना कर्नल मेटाकुटीला आला. सॅमने हॉटेलला 5 चकरा मारल्या होत्या, अजूनही कर्नल थकत नाही हे पाहून सगळ्यांचाच आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला होता. पण शेवटी एका टेबल वरून उडी मारताना कर्नल पडला. नंतर तो काही वेळ तसाच उभा राहिला. पुढे काय होणार याची कुणालला कल्पना आली, त्याने क्युब्स आणि मिल्झला इशारा केला. कर्नलने त्याचा हात डोक्याच्या दिशेने न्यायला सुरुवात केली तोच क्युब्स आणि कुणाल त्याच्या अंगावर तुटून पडले. कर्नल धडपडला आणि खाली कोसळला. त्याने पहिले की कुणाल आणि क्युब्सने जाणून बुजून आपल्याला धक्का दिला. त्यांची चाल कर्नलच्या लक्षात आली. तो चिडून उभा राहिला. कर्नल थकलेला होता व त्याला अजून स्पेशल पॉवर मिळाली नव्हती, त्यामुळे कुणालला वाटले की आपण काही वेळ तरी त्याला रोखू शकतो. त्याने व क्युब्सने कर्नलचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण कर्नलने सहजपणे दोघांना झटका देऊन खाली पाडले. आता सगळी मदार मिल्झवर होती.
    मात्र मिल्झ सावध होता. त्याने पहिले की कर्नल आपल्या डोक्याकडे हात नेतो आहे, त्याने आपले कौशल्य वापरून कर्नलचे दोन्ही हात ब्लॉक करून टाकले. कर्नल त्या कुंग-फु ब्लॉक मधून हात काढतो न काढतो तोच, मिल्झचा ठोसा त्याच्या दगडी छातीवर बसला. त्या प्रहरातील अचाट शक्तीने तो दगडही थोडासा डगमगला. मिल्झने क्षणाचीही उसंत न घेता कुंग-फु मधील कौशल्य पणाला लावून ठोसे आणि लाथांचा कर्नलवर भडीमार केला. कर्नलने मैदानी कुस्ती सोडून बरेच दिवस झालेले असल्याने त्याला कुस्तीमधील एकही डाव-पेच आठवला नाही. तो गांगरला आणि बचावाचा केविलवाणा प्रयत्न करू लागला. कर्नलचा निभाव लागला नाही आणि शेवटी तो कोसळला.
    तो कोसळलेला पाहून कुणालने आनंदाने आरोळी ठोकली. क्युब्स, मिल्झ आणि सॅम सुद्धा आनंदाने नाचू लागले. कुणालने कर्नलला सागुच्या आखाड्यात पोचवण्याची व्यवस्था केली आणि सगळ्या उपस्थितांना मोफत जेवण आणि दारूची घोषणा केली. काही वेळातच सलीम आणि हँडसम आपापल्या मित्रांना घेऊन जल्लोष स्थळी पोहोचले. दारूच्या नद्या वाहायला प्रारंभ झाला. कुणाल आणि क्युब्सला हर्षवायू झाला होता. अर्थात ह्याला कारणही तसेच होते. एका नराधम गजनीचा अंत झाला होता.
                                                                                        काव्यानंद