रोजचा कस्टमर सलीम फेकूला हे दृश्य पाहून एक कल्पना सुचली. त्याने आपला जानी दुश्मन हँडसमचा काटा कर्नलकरवी काढायचे ठरवले. खरतर हँडसम सलीमचा जुना दोस्त. दोघंही दररोज एकत्र दारू पिऊन आपल्या व्यथा मांडणारे. दररोजच्या त्यांच्या संभाषणाचा शेवट ठराविक प्रकारेच व्हायचा. "ये दुनिया बडी बेरहम और पत्थरदिल है दोस्त" हँडसम म्हणायचा. "अरे इसी पत्थरदिल दुनिया के जिगर का छल्ला है तू हँडसम !" सलीम म्हणायचा. त्यानंतर ते घरी जायचे. बिल देण्याचा तर प्रश्नच नव्हता. एके दिवशी हँडसम म्हणायचा "मै कही भाग जा रहा क्या भाई? मिलता ना तुम्हारा पैसा" तर दुसरे दिवशी सलीम "हौ रे मिलते तेरे पैसे. सडी सुरतो का सिग्रेट अड्डा है ये" असे म्हणून कुणालच्याच हॉटेलला शिव्या मारून जायचा. ही अभद्र युती तोडण्यासाठी कुणालनेच 'फोडा आणि झोडा' नीती वापरून दोघांना वेगळे केले होते.
योजनेनुसार दुसऱ्या दिवशी सलीम हँडसमकडे गेला. आपल्याला पश्चात्ताप झाला आहे असे सांगून "पुरानी दुष्मनी भूल जाओ यारो" अशी साद घातली व फुकट दारू पाजायचे कबूल केले.
दोघेही कुणालच्या हॉटेलात गेले. गेल्यावर सलीम बारवरच्या वेटरच्या कानात काहीतरी पुटपुटला. वेटरने मान डोलावली. सलीमने हँडसमला बारवर जाऊन 'स्टार्ट' होण्यास सांगितले व आपण ५ मिनिटात येतो म्हणून तो सटकला. हँडसम बऱ्याच दिवसांनी मनसोक्त दारू पीत होता.
पिणे संपले तरी सलीम दिसेना म्हणून त्याने वेटरला विचारले. "ते केव्हाच गेले. आम्ही दोघे बरोबर नाहीत असे त्यांनी सांगितले." सलीमला मनातल्या मनात दोन शिव्या हासडून हँडसम निघाला. कुणालवर त्याने नेहमीचाच डायलॉग फेकला, पण कर्नल दारात उभा होता. हँडसमने कर्नलशीही लाडीगोडी करण्याचा प्रयत्न केला, पण गजनीकांत दगडासारखा उभा होता. हँडसमचा लाडीगोडीचा प्रयत्न पाहून त्याला राग आला. त्याने पहिला फटका हँडसमच्या कानशिलावर दिला. हँडसम धडपडला. कर्नलने पूर्ण उत्साहात फटकेबाजी सुरु केली. सलीम रोडपलीकडे एका कोपऱ्यात लपून ह्या show चा पूर्ण आनंद लुटत होता.
दुसऱ्या दिवशी ही गोष्ट हँडसमचा जिवलग मित्र रज्जू-मुज्जुला कळाली. त्याला भयंकर संताप आला. त्याने आधी हँडसमची फुकट दारूच्या अमिषाला भाळल्याबद्धल खरडपट्टी काढली. नंतर त्याने सलीमला त्याच्याच औषधाची चव देण्याचे ठरवले.
एके दिवशी सलीमला त्याने रस्त्यात पकडून सांगितले कि त्याला शाळेत शिपायाची नोकरी लागली आहे. सलीमने पार्टी मागताच त्याने तत्काळ कबूल केली व त्याला कुणालच्या हॉटेलवर घेऊन गेला. रज्जू व हँडसम यांच्या मैत्रीची खबर सलीमला नसल्यामुळे त्याला काही संशय आला नाही. रज्जूने गेम रिपीट केला. सलीमला दारू ढोसायला लावून तो सटकला. सलीमच्या हे लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता.
पण सलीमने धीर सोडला नाही. काउंटरवर 'एक तिखट मिसळ व पाच मठ्ठा' यांचे बिल देणाऱ्या म्युल्चे पाकीट त्याने मारले. त्यात दोन रुपये व एक रुपयाच्या नोटेचे तुकडे जुळवून केलेली नोट व 'पाकीटमार तेरा मुह काला' अशी चिठ्ठी पाहून सलीम चरफडला. शेवटी हातचलाखीची परिसीमा दाखवून त्याने गल्ल्यातीलाच थोडे पैसे चोरले व कसेबसे बिल भरले.
इकडे फुकटे गिऱ्हाईक कमी झाल्याने कुणालचा धंदा वधारला होता. त्याने याबद्धल पुनःपुन्हा कर्नलचे आभार मानले. कर्नलचे गुरु पै. सागुदेखील त्याचे कारनामे पाहण्यास हॉटेलमध्ये आले व त्याची कौशल्ये पाहून त्याची पाठ थोपटून गेले. ह्या सगळ्याचा परिणाम होऊन कर्नलच्या मनात वेगळीच विचारचक्रे सुरु झाली.
(क्रमशः)
काव्यानंद